राज्यातील पिस्तुलच्या गुन्ह्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात

पुणे, – राज्यभरात गेल्या दहा वर्षांत दाखल असलेल्या पिस्तुल आणि रिव्हॉल्वरच्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांनी गोळा करण्यास सुरुवात केली असून एकूण दहा जिल्ह्यांची माहिती आजपर्यंत संकलीत झाली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हे संकलन सुरू केले असून यातून तरी काही धागा सापडतोय का ते पळताळून पाहण्यात येत आहे.

डॉ. दाभोलकरांची हत्या सुपारी देऊन आणि नियोजनबद्ध रितीने घडविण्यात आलेली आहे, त्यामुळे मारेकर्‍यांकडे अग्निशस्त्र कोठून आले, ते त्यांनी विकत घेतले किंवा त्यांना कोणी दिले, याची माहिती घेण्यात येत आहे. तपासामध्ये सुरुवातीच्या काळात असलेल्या काही शक्यता आता मागे पडल्या आहेत. परंतु, सराईत गुन्हेगारांवरचे लक्ष पोलिसांनी कमी केलेले नाही.

दाभोलकरांच्या हत्येमध्ये अग्निशस्त्राचा वापर झाल्यामुळे राज्यभरात गेल्या दहावर्षात अग्निशस्त्रांशी संबंधित दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. हे आरोपी सध्या कुठे आहेत याची पडताळणी करण्यात येत आहे. कारागृहात बंद असलेले, जामिनावर सुटलेल्या तसेच मरारी आरोपींची पोलिसांकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. ते सर्व गुन्हेगार 20 ऑगस्ट रोजी सकाळी नेमके कुठे होते, ते लोकेशन मिळविण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांकडून देण्यात आली.