नर्गिस होणार प्रेमदिवानी

-बॉलीवूडचा प्रेम म्हणजे सलमान खानसोबत चित्रपटांमध्ये चमकलेल्या बहुतांश नट्यांची कारकीर्द चांगलीच बहरली आहे. प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक सूरज बडजात्या आपल्या आगामी चित्रपटातून सलमानचे अतिशय आवडते पात्र प्रेम पुन्हा एकदा पडद्यावर आणणार आहे. या चित्रपटासाठी जशा अभिनेत्रीचा तो शोध घेत होता, तो बहुधा आता थांबला आहे. बडजात्या आपल्या आगामी चित्रपटासाठी रॉकस्टारफेम नर्गीस फाखरीची सलमानसोबत जोडी जमविण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नर्गिसने हल्लीच या चित्रपटाच्या निर्मात्याशी भेट घेतली. केवळ भेटच घेतली नाही तर त्यातील भूमिकेसाठी ऑडिशनही देऊन आली. ऑडिशनची ही दुसरी फेरी असल्याचे नर्गिस ही भूमिका मिळविण्याच्या अतिशय जवळ पोहोचल्याचे मानले जात आहे. खरेतर या भूमिकेसाठी नर्गिसच्या आधी डायना पंटीच्या नावाची चर्चा होती. तिच्याशी बोलणीही सुरू होती, पण हळूहळू तिचे नाव मागे पडत गेले. नेमका तेव्हाच नर्गिसचा ‘मद्रास कॅफे’ हा चित्रपट पडद्यावर झळकला.

त्यातील नर्गिसची अदाकारी सूरजसह सगळ्य़ांनाच आवडली. त्याचवेळी या चित्रपटाची कहाणी नर्गिसला ऐकवून तिचे एखादे ऑडिशन घ्यावे असा निर्णय घेण्यात आला. असे समजते की, या चित्रपटासाठी सलमानने आपल्या तारखा दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्या चित्रीकरणास सुरुवात होऊन पुढच्या वर्षी जूनपर्यंत हा चित्रपट पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे. सलमानसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने नर्गिस सध्या प्रचंड आनंदात आहे. सलमानसोबत बड्या चित्रपटात काम करणे आणि तेही तो त्याच्या सर्वाधिक आवडते पात्र प्रेमच्या रूपात परतत असताना, हा आपल्यासाठी दुग्धशर्करायोग असल्याचे ती सांगते. अर्थात, यासंबंधी अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.