आजकाल अनेक कलाकार एखाद्या चित्रपटासाठी कथेच्या मागणीनुसार आपले वजन कमी वा जास्त करून घेतात. त्यासाठी आहाराची पथ्ये पाळण्यासोबतच व्यायाम व योगावर कठोर मेहनतही घेतात. अनुराग कश्यपचा शोध म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हुमा कुरेशीही सध्या अशीच मेहनत घेताना दिसत आहे. खरे म्हणजे तिच्याकडे ना कुणा दिग्दर्शकाने अशी मागणी केली आहे, ना तिला स्वत:ला आपल्या वजनाबाबत समस्या आहे. तरीही आजकाल ती योगासनांमध्ये घाम गाळताना दिसत आहे.
हुमाला कुणी वजन कमी करायला सांगितलेले नसूनही ती योगा करत आहे. आता यामागे फक्त एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे स्वत:ला फिट आणि सडसडीत ठेवण्याची इच्छा. आपल्या योगासनांची माहिती स्वत: हुमानेचे ट्विटरवर दिली आहे. ट्विटरवर हुमा सांगते की, सध्या मी योगासने करण्याचा आनंद घेत आहे व त्यासाठी सकाळी लवकर उठत आहे. सुरुवातीस लवकर उठून योगासने करणे अवघड जात होते व त्याचा कंटाळाही येत होता, पण एकदा का तुम्ही सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेतली तर त्याचे परिणाम जलदगतीने दिसू लागतात.
हुमा सध्या बडे बॅनर आणि मोठय़ा कलाकारांसोबत चित्रपटांत काम करीत आहे. चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘एक थी डायन’ चित्रपटास बर्यापैकी यश मिळाले होते. दुसरीकडे डीडे चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. डीडेमध्ये हुमा एका अँक्शन भूमिकेत होती. आजवर अशी भूमिका केलेली नसल्याने तिच्यासाठी ती मोठी आव्हानात्मक होती. मात्र आपले सर्वस्व पणाला लावून तिने त्यात रंग भरले. या चित्रपटानंतर हल्ली ती विशाल भारद्वाजच्या आगामी ‘डेढ इश्किया’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तिच्यासोबत धकधक गर्ल माधुरी दीक्षित, नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी असे तगडे कलाकार आहेत.
माधुरीसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने हुमा खूश आहे, पण तिच्या तुलनेत आपण कुठेही कमी पडू नये याचीही ती खबरदारी घेत आहे. म्हणूनच बहुधा योगा करून ती स्वत:ला अधिकाधिक आकर्षक दाखविण्याचा प्रय▪करीत आहे. ‘डेढ इश्किया’मध्ये हुमाची अर्शदसोबत अतिशय उत्तेजक दृश्ये आहेत. माझ्यात अपील नसते तर बड्या बॅनरच्या चित्रपटासाठी मला निवडलेच नसते. माझ्यात काहीतरी असल्याने मला संधी मिळत असल्याचे ती सांगते.