मंडपातील छेडछाडीला मंडळ राहणार जबाबदार

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईत महिलांवरील अत्याचारात सतत वाढ होत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लवकरच येणा-या गणेशोत्सवादरम्यान वाढत्या गर्दीत, महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनावर पोलिसांनी उपाय शोधला आहे. गणेशोत्सवादरम्यान एखाद्या मंडपात महिलेशी गैरवर्तणूक किंवा छेडछाड झाली तर त्याकरीता त्या गणेश मंडळाला जबाबदार धरले जाईल, अशी सूचना मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता मंडळाची जबाबदारी वाढली असून त्यांना आता महिलेशी गैरवर्तणूक किंवा छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

गेल्यात काही दिवसांपासून मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यासंदर्भात नुकतीच पोलिस दलाची एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. एखाद्या मंडळात जर छेडछाडीचा प्रकार घडला तर त्याकरता मंडळ जबाबदार असेल तसेच पुढच्या वर्षी या मंडळांना मान्यता देण्याबाबत फेरविचार करावा लागेल, अशी सूचनाही मुंबईचे पोलिस आयुक्त सिंग यांनी यावेळी दिली.

पोलिस आयुक्तांच्या या नव्यात आदेशामुळे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी गणेश मंडळावर पडणार असल्याने असे प्रकार घडू नयेत यासाठी आगामी काळात मंडळांकडून जास्तीत जास्त काळजी घेतली जाईल. तसेच यामुळे पोलिसांवरील बारही थोडासा हलका होईल. त्यामुळे आता येत्या काळात मंडळाची जबाबदारी वाढली असून त्यांना आता महिलेशी गैरवर्तणूक किंवा छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.