आसाराम बापूच्या दिल्ली आश्रमाचा ताबा घेण्याची तयारी

नवी दिल्ली – अल्पवयीन मुलीशी कुकर्म केल्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या आसाराम बापू यांचे दिल्लीतून उच्चाटन करण्याच्या मोहिमेने वेग घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दिल्लीच्या करोलबाग भागात असलेला आसारामबापूंचा आलिशान आश्रम रिकामा करून ताब्यात घेण्याची हालचाल वनविभागाने सुरू केली आहे. त्यासंबंधीचे परवानगी मागणारे पत्र वनविभाग शहर विकास मंत्रालयाकडे सोमवारी रवाना करणार असल्याचे समजते.

सेंट्रल रिज भागात असलेल्या ८०० हेक्टर जागेत हा आश्रम असून यापैकी ४०० हेक्टर जागेवर वन आणि वन्य प्राणी विभागाचा हक्क आहे. बाकी जमीन दिल्ली डेव्हलपमेंट अॅथॉरिटी व केंद्रीय लोकनिर्माण विभागाची आहे. या जमिनीत आश्रमाची इमारत आहे. ही जमीन आश्रमाच्या मालकीची व्हावी यासाठी आसाराम यांच्या संस्थेने २००६ साली संबंधित विभागाकडे अर्ज दाखल केला होता मात्र हा अर्ज अतिरीक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट दक्षिणी यांनी फेटाळून लावला होता. मात्र तरीही येथे आश्रम सुरूच राहीला ्रआहे.

आता मात्र दिल्ली वन आणि वन्यजीव विभागाने ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या असून शुक्रवारी या संदर्भात अधिकार्यांतची एक बैठक पार पडली असल्याचे व केंद्रीय लोकनिर्माण मंत्रालयाकडे पाठविण्याचे पत्र तयार करण्यात आले असल्याचे विभागप्रमुख जी.एन सिन्हा यांनी सांगितले.