राजस्थानी ऑलिव्ह ऑईल करणार परदेशी ब्रँडशी स्पर्धा

जयपूर दि.५ – देशात वाढत चाललेली ऑलिव्ह ऑईलची मागणी आणि ती पुरी करण्यासाठी आयात करताना देशाला खर्चावे लागत असलेले परकीय चलन वाचू शकेल अशी आशा राजस्थान राज्यातील ऑलिव्ह वृक्षांच्या यशस्वी लागवडीमुळे निर्माण झाली आहे. राजस्थान सरकार आगामी दोन ते तीन वर्षात ऑलिव्ह ऑईलचे व्यावसायिक उत्पादन स्वतःच्या ब्रँडखालीच करू शकणार असून तसे प्रयत्न सुरू आहेत.

देशात गेल्या वर्षात ११ हजार मे.टन ऑलिव्ह ऑईल आयात केले गेले. ही मागणी २०२५ पर्यंत ४२ हजार मे.टनांवर जाईल असा अंदाज आहे. मात्र राजस्थानातील यशस्वी उत्पादनामुळे देशातच हे तेल उपलब्ध होणार असून त्यामुळे आयातीला आळा बसू शकणार आहे. राजस्थान सरकारने प्रायोगिक तत्त्वावर केलेली ऑलिव्ह लागवड यशस्वी ठरली आहे. आता राजस्थान ऑलिव्ह कल्टिव्हेशन लिमि. खासगी शेतकर्यां्नाही ही लागवड करण्यासाठी मदत पुरविणार आहे.

संस्थेचे मॅनेजर कुमार वर्मा म्हणाले की पाच जिल्ह्यातील प्रत्येकी ५० हेक्टर क्षेत्रात ही लागवड यशस्वी ठरली असून यापुढे आणखी ३०० हेक्टर जमीन या लागवडीखाली आणली जाणार आहे. येत्या कांही वर्षात संघ शेतीच्या माध्यमातून ५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आणले जाणार आहे. गट उत्पादन घेणार्याध शेतकर्यां ना पहिली तीन वर्षे मोफत तंत्र सल्ला दिला जाणार आहे. ऑलिव्ह खरेदीची तयारी अनेक कंपन्यंानी दाखविली आहे मात्र भविष्यात स्वतःच्या ब्रँडखालीच तेल उत्पादन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

इस्त्रायली तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाखाली ही लागवड केली गेली आहे. राजस्थानचे हवामान त्यासाठी अनुकुल ठरले असून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी २००६ मध्ये इस्त्रायलला दिलेल्या भेटीत या कार्यक्रमाची सुरवात झाली. ऑलिव्ह फळातून तेल काढण्यासाठी ३ कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प बिकानेर जिल्ह्यातील लूनाकरसर येथे उभारला गेला असून तेथील यंत्रातून दर तासाला ५०० टन तेल गाळता येणार असल्याचेही समजते.