नवी दिल्ली – बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत मुंबई आणि दिल्लीतून एकापेक्षाही एक अंगावर काटा आणणार्या बातम्या कानावर येत असतानाच दिल्लीमध्ये एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना घडल्या आहेत. एका बारा वर्षाच्या मुलीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केला. तर एका नराधमाने आपल्या शेजारी राहणार्या चार वर्षाच्या लहान मुलीला आपल्या वासनेची शिकार केले. अन्यत्र एक अल्पवयीन मुलगी आणि एक महिला अशा दोघींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला.
दिल्लीत एकाच दिवशी चार बलात्कार
नवी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारात खुद्द पोलीसच सहभागी असल्याचे आढळून आले होते आणि हा धक्का ताजा असतानाच एका दिवसांत चार घटना घडल्या त्यामुळे जाणकार नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पूर्व दिल्लीच्या वेलकम एरियामध्ये एका कामांध व्यक्तीने बारा वर्षाच्या आपल्या सावत्र मुलीवर अत्याचार केला. ही घटना कळल्यानंतर हा इसम पळून गेला. तर किर्ती नगरमध्ये १९ वर्षे वयाच्या तरुणाने चार वर्षाच्या मुलीशी दुष्कृत्य करून या मुलीला बेशुध्द अवस्थेत रेल्वेच्या रुळाच्या बाजूला टाकून दिले. या घटनेनंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
याच किर्ती नगर भागामध्ये ४० वर्षाच्या एका महिलेवर तिच्या शेजारच्या २४ वर्षे वयाच्या युवकाने रविवारी रात्री अत्याचार केला. या युवकाला अटक करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीच्या एका वस्तीमध्ये १६ वर्षाच्या युवकाने १० वर्षे वयाच्या मुलीवर तिला स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याही मुलाला अटक करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने बलात्कार केला असल्याचे उघड झाले.
