आसारामबापूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जोधपूर – लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या आसारामबापूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जोधपूर कोर्टाने आसारामबापूंना ही कोठडी सुनावली आहे.

आसारामबापूंना शनिवारी रात्री इंदूरमधील त्यांच्या आश्रमातून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर बापूंना आज पुन्हा एकदा जोधपूर कोर्टात सादर केल्यानंतर त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आश्रमातीलच एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी आसाराम यांचा लपंडाव सुरू होता. अखेर शनिवारी रात्री जोधपूर पोलिसांनी त्यांना अटक केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, एका सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसारामबापू यांच्या विरोधात दाखल असून या प्रकरणाच्या तपासात आमची केस अधिक बळकट झाली आहे, असे जोधपूर पोलिसांनी म्हटले आहे. आमचा तपास योग्य दिशेने होत आहे, असेही ते म्हणाले.

या तपासाच्या संबंधात जोधपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय पाल लांबा यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यात आम्हाला आणखी काही कालावधी लागेल. आसाराम यांना न्युरो डिसऑर्डरचा त्रास होत असल्याच्या दाव्या संबंधात विचारले असता ते म्हणाले की, त्यांना तसा आजार नाही. त्यांच्या मुलाला जे काही म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू  द्या. त्यांच्याविषयी आम्हाला काहीहंी म्हणायचे नाही. तथापि, आसाराम यांना कोणताही आजार नाही असे आम्हंी स्पष्ट करू इच्छितो. आसाराम हे लैंगिक कृत्ये करण्यास सक्षम असल्याचे वैद्यकीय तपासणीवरूनहंी स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. ते वेळच्यावेळी अन्न घेत असल्याचेहंी त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.