गृहमंत्रालयाने घेतला समीर वानखेडेंना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय


मुंबई – गृहमंत्रालयाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता झेड प्लस सुरक्षा समीर वानखेडेंना देण्यात येणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप केले आहेत. २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्डेलिया क्रूझवर त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याच्या घडीला समीर वानखेडे यांच्या लग्नाबाबत, त्यांच्या धर्माबाबत मोठा वाद सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यांचे पहिले लग्न एका मुस्लीम महिलेशी झाले होते. पण, त्यावेळी समीर वानखेडे हे देखील मुस्लीमच होते, असा दावा त्यांचे लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. तर दूसरीकडे समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मात्र आपण हिंदूच असल्याचे सांगितलं आहे. या मुद्द्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, एनसीबीकडे नवाब मलिक यांनी पाठवलेल्या पत्रावर विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नवाब मलिक यांनी हे पत्र एनसीबीकडे पाठवून त्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण, महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या संचालकांना पाठवलेल्या निवावी पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे.