साधू वेषातले धर्मद्रोही

आसाराम बापू हे सतत वादग्रस्त राहिलेले आहेत. त्यांचा थाटमाट पाहिल्यावर त्यांना संत कसे म्हणावे असा प्रश्‍न पडतो. संतांची राहणी साधी असते पण आसाराम बापू तर फारच श्रीमंती थाटात रहात असतात. साधूंनी थोडा आराम केला म्हणून काय बिघडले असा प्रश्‍न अनेकदा विचारला जातो पण या प्रश्‍नात काही अर्थ नाही. साधूंनी सात्त्विक राहणीचा आदर्श लोकांसमोर ठेवलेला असतो. ते सात्त्विकतेचा उपदेश करत असतात पण ते जर असे थाटामाटात रहायला लागले तर त्यांच्या सात्त्विक राहणीमानात अडथळा येतो आणि त्यांच्या मनात तामसी विकार उद्भवू शकतात म्हणून साधूंनी साधेच राहिले पाहिजे. ज्या साधूंची साधी राहणी सुटली त्यांच्या विषयी लैंगिक संबंधाच्या बाबतीत आरोप करण्यात आले असल्याचे दिसून आले आहे ही गोष्ट आवर्जुन नमूद केली पाहिजे. आसाराम यांचे असेच झाले आहे. त्यांनी आपल्या साध्या राहणीच्या व्रताला रामराम ठोकला आणि आसारामाचा असा का राम झाला असा प्रश्‍न विचारण्याची वेळ आली. हे अध:पतन व्रताचा त्याग केल्याने झाले. अर्थात या अध:पतनाचीही एक कारणमीमांसा असते आणि ते भक्तांपर्यंत येऊन पोचते. कारण आपल्या देशातले भक्तही संतांना गरज नसताना पैशात न्हाऊ घालतात आणि ज्यांना संयम ठेवता येत नाही ते साधू पैशाच्या मोहात वहात जातात.

एकदा पैसा हाती आला की आश्रम आणि पैशाच्या निमित्ताने येणारे राजकारण यांची बाधा कधी होते याचा पत्ताही लागत नाही. त्यातून मग ऐश्‍वर्याची बाधा होते. मग बुवा ते बाया असे चित्र दिसायला लागते. गंमत म्हणजे नेते मंडळीही अशा भोंदू बाबांसमोर माथा टेकवायला लागतात. पैसा आणि बाई यांचा संसर्ग झाला की अपराध घडायला लागतात पण त्यांच्यावर कायद्याची कारवाई करण्याची वेळ आली की नेत्यांचा दबाव येतो. कायद्यासमोर सारे समान असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्षात यांना सहजासहजी अटक केली जात नाही. खरे तर अशा लोकांवरचे आरोप गंभीर असतात. पण अशाच आरोपाखाली एखाद्या सामान्य आरोपीला जशी तत्परतेने अटक केली जाते तशी या मोठ्या लोकांना होत नाही. आसाराम बापू यांचे असेच झाले. त्यांच्यावर १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आता आसाराम बापूंना अटक करतानाही असाच प्रकार घडला. त्यांना कायद्यानुसार अटक होणे अटळ होते पण त्यांनी सातत्याने पोलिसांवर दबाव आणून अटक लांबणीवर टाकली. पुरावे नष्ट करण्याचे काम चोख पार पाडून त्यांना अखेर अटक करण्यात आली.

असे असले तरीही ७२ वर्षाचे हे भोंदू बाबा १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करतात ही बाब धक्कादायकच आहे. आसाराम बापू हा माणूस तसा विचित्र आणि वादग्रस्तच आहे. सध्या आपल्या देशात पंचतारांकित महाराजांचे पेवच फुटले आहे आणि त्यांनी हजारो कोटी रुपयांच्या मालमत्ता कमावल्या आहेत. सत्य साई बाबा हे असेच चमत्कार दाखवून लोकांना कच्छपी लावणारे भोंदू साधू होते. अशा लोकांना वश होणारेही हजारो भोळे भाविक या देशात आहेत. लोकशाहीची एक अशी गंमत आहे की,जिथे लोक आहेत तिथे पुढारी आहेत. गुळाच्या ढेेपीला जसे मुंगळे चिकटतात तसे जनता दिसली की नेतेही चिकटतात. बाबा आणि महाराजांचे प्रस्थ वाढण्यास हेच एक कारण आहे. अशा बाबांच्या समोर होणारी भक्तांची गर्दी पाहिली की नेतेही त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचे नाटक करतात. एखादा नेता असा काही निमित्ताने आपल्या कच्छपी लागला की महाराजही त्याच्या वजनाचा नेमका फायदा घेतात आणि ज्या अर्थी आपले नेते अशा बाबांच्या पाया पडतात त्या अर्थी बाबांत काही तरी पॉवर असणारच अशी लोकांचीही भावना होते. परिणामी पॉवर आहे म्हणून नेते झुकतात आणि नेते झुकतात म्हणून जनताही झुकते. अशा ठिकाणी पोलीसही बोटचेपेपणा करतात. आसाराम बापूंची अटक त्यामुळेच लांबली.

राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या पोलिसांनीही अशीच भूमिका घेतली होती म्हणून शरणागती पत्करण्याचा अंतिम इशारा देऊनही आसाराम शरण आले नाहीत.आता मात्र त्यांना अटक झाली आहे. आसाराम बापू हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. पाण्याची टंचाई असतानाही रंगपंचमी खेळण्याने त्यांची बदनामी झाली. त्यांच्या गुजरातेतल्या आश्रमात मागे दोन लहान मुलांची प्रेते संशयास्पद अवस्थेत सापडली. एरवी वादग्रस्त विधाने करून ते अंगावर वाद ओढवून घेतच असतात. पण आता तर त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आला. एवढे होऊनही त्यांचे अनेक अनुयायी त्यांना आताच निर्दोष ठरवत आहेत आणि बापू असे काही करूच शकत नाहीत अशी ग्वाही देत आहेत. कारण त्यांच्या मनावर बापूंचे गारूड आहे. हे गारूड लोकांच्या अज्ञानामुळे निर्माण झाले आहे. लोकांना धर्म म्हणजे काय हे समजत नाही. बाबा आणि भोंदू साधूंना हेच भांडवल मिळते. खरे तर धर्म हा तत्त्वज्ञानावर आधारलेला असतो. पण लोकांना धर्माची ही बाजू समजत नाही. ते चमत्कार करणार्‍या अशा भोंदू आणि ढांेंगी साधूंच्या करणीलाच धर्म समजत असतात. असे साधूही लोकांच्या या मनोवृत्तीचा फायदा करून घेतात. त्यांना नादी लावून पैसा कमावतात. आपले अवडंबर माजवतात आणि मठांत पुण्याचा साठा करण्याऐवजी धनाचा साठा करतात. धर्माची बदनामी अशाच लोकांमुळे होत असते.