‘त्या’ नराधमाला फाशी हवी- निर्भयाच्या कुटुंबाची मागणी

नवी दिल्ली – दिल्लीतील ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.

शनिवारी दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जुवेनाईल कोर्टाने दोषी ठरवत तीन वर्षाची शिक्षा सुनावली आणि बाल सुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आली. मुख्य न्यायदंडाधिकारी गीतांजली गोयल यांनी ही शिक्षा सुनावली.

`ज्या पद्धतीने आमच्या मुलीवर सामूहिकरित्या बलात्कार करण्यात आला त्यातील दोषींना खरे तर फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. पण त्याला फक्त तीन वर्षांची बाल सुधारगृहात राहण्याची शिक्षा सुनावल्याने आम्ही निराश झालो,’ असे पीडित तरुणीच्या वडिलांनी सागितले. कोर्टाच्या या निकालामुळे आणखी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, जुवेनाईल कोर्टाने दोषी ठरवलेल्या या अल्पवयीन आरोपीने नुकतेच अठरा वर्ष पूर्ण केली आहेत. १६ डिसेंबर २०१२ला बलात्काराच्या घटनेवेळी त्याचे वय साडेसतरा वर्ष होत.