पुणे, – संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी साहित्यक्षेत्रात किती योगदान हवे, याचे कोणतेही निकष नाहीत. पण गेेली पन्नास वर्षे मी साहित्य क्षेत्रात कोशवाङमयापासून ते प्रत्येक वाङमय प्रकारामुळे निगडीत आहे, मी माझ्या साहित्यातून पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल असे दिले आहे, त्यामुळे मी संमेलनाध्यक्षपदास पात्र असल्याचा विश्वास आहे, असे मत ज्येष्ठ कवयित्री आणि सासवड येथे होणार्या 87 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या उमेदवार प्रभा गणोरकर यांनी व्यक्त केले.
साहित्य क्षेत्रात 50 वर्षाचे योगदान असल्यानेच अध्यक्षपदासाठी प्रयत्न - प्रभा गणोरकर
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आचार्य अत्रेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि माझ्या अर्जावर आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांची स्वाक्षरी आहे, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासठी मी उद्या (1 सप्टेंबर) पासून सासवड येथून प्रचाराचा प्रारंभ करणार आहे, असे गणोरकर यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी उभ्या आहात, तुमचे साहित्यक्षेत्रात योगदान काय आहे? असा प्रश्न अनेकजण विचारतात, असे सांगत गणोरकर म्हणाल्या, मी 1961 पासून वाङ्मयाशी निगडित आहे. मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांचे अध्यापन व अध्ययन करीत आहे. स्वतःचे साहित्य प्रकाशित न करता कोश वाङ्मय निर्मितीसठी 8 वर्षे दिली. मराठी माणसांच्या पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त असे काम करून ठेवले आहे. या कामाचा मला अभिमान आहे. एवढे काम संमेलनाध्यक्ष होण्यासाठी पुरेसे आहे, असे मला वाटते. ‘व्यामोह’ हा कविता संग्रह आणि ‘वृत्तमानस’ या नियतकालिकातील ललित लेखनाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत महिला संमेलनाध्यक्ष चारच झाल्या आहेत. याविषयी त्या म्हणाल्या, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष अशा चारच महिला संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत. मी माझ्या समकालीन लेखिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उभी आहे. या परंपरेत महिलांनी पुढे यावे, असे वाटते. धकाधकीच्या जीवनात महिलांना एवढा वेळ यासाठी मिळेल असे नाही. त्याचा अनुभव मी वसंत डहाके जेव्हा संमेलनाध्यक्षपदाला उभे होते तेव्हा घेतलेला आहे, असे गणोरकर यांनी सांगितले.
अध्यक्षपदाच्या दावेदार
संमेलनाध्यक्षपद निवडणुकीच्या मतदारांमध्येही महिलांची संख्या कमी आहे. आजपर्यंत साहित्यिक अरुणा ढेरे यांना संमेलनध्यक्षपद मिळायला हवे होते, असे सांगत गणोरकर म्हणाल्या, प्रतिमा इंगोले निवडणुकीच्या राजकारणाला कंटाळल्या असल्या तरी त्यांनी पुन्हा प्रयत्न करायला हवेत. प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, नीरजा, मल्लिका अमर शेख या महिला साहित्यिकांना भविष्यात संमेलनाध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा गणोरकर यांनी व्य्नत केली.
