नवी दिल्ली : तेलंगण राज्याच्या निर्मितीचा निर्णय झाल्यावर महाराष्ट्रातील विदर्भच्या मागणीला वेग आला आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगतचे मध्य प्रदेशातील चार जिल्हे यांचे मिळून गोंडवन-विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याबाबत लक्ष वेधण्यासाठी केंद्रातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
विदर्भातील काँग्रेस नेते मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे व मारोतराव कोवासे हे विदर्भातील चार काँग्रेस खासदार आणि माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया यांनी याबाबत लक्ष वेधण्यासाठी केंद्रातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. विदर्भातील काँग्रेस नेत्यांची एक बैठकही आयोजित करण्यात आली असून ही बैठक २ ऑक्टोबर रोजी वर्ध्यामध्ये सेवाग्राम किंवा अकोला येथे होणार आहे.विदर्भवादी नेत्यांनी काँग्रेसचे ए. के. अँटनी, दिग्विजय सिंह, अंबिका सोनी, मोतीलाल व्होरा आणि गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वेगळ्या विदर्भासाठी आग्रह व्यक्त केला.
या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस मोहन प्रकाश यांना निमंत्रित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वेगळया विदर्भ मागणीने जोर धरला आहे.