सीमांध्रा भागातील आमदारांचे बेमुदत उपोषण

हैदराबाद – आंध्र प्रदेशाच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी सीमांध्रा भागातील आमदारांनी आणि कॉंग्रेसच्या पुढार्‍यांनी हैदराबाद येथे येत्या ३ तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेशाच्या प्राथमिक शिक्षण खात्याचे मंत्री एस. शैलजानाथ यांनी काल हैदराबाद येथे ही घोषणा केली. सीमांध्रा भागातील सर्व आमदार या उपोषणात सहभागी होतील अशी माहिती त्यांनी दिली. या भागातील १३ जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून राज्य विभाजनाच्या विरोधात आंदोलन सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आंदोलनाची धार वाढवण्यासाठी या उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी, तेलुगु देसम आणि डाव्या आघाडीतल्या पक्षांनी राज्याच्या विभाजनाला अनुकूलता दर्शविली असून तसे निवेदन केंद्राकडे पाठवले आहे. या पक्षांनी हे पत्र मागे घ्यावे आणि आंध्राच्या विभाजनाला विरोध करावा असे आवाहन शैलजानाथ यांनी या पक्षाच्या नेत्यांना केले. सीमांध्रा भागातील ६ लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन गेल्या महिन्यापासून सुरू असून त्यातून लोकांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. त्या भावनांचा आदर करून या सर्व राजकीय पक्षांनी तेलंगण निर्मितीला विरोध करावा असे शैलजानाथ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.