पाटणा – गेल्या सहा महिन्यापासून नेपाळच्या पोखरणा भागामध्ये लपून बसलेल्या यासीन भटकळ याने नेपाळमध्ये अनेक मुस्लीम तरुणांना दहशतवादाची दीक्षा दिली असून त्याच्या शब्दावर वाटेल ते करण्यास तयार असणारे शंभर दहशतवादी तयार केले आहेत. मधुबनीच्या पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात यासीन भटकळने स्वतःच ही माहिती दिली. तो नेपाळमध्ये सहा महिने राहिला असला तरी त्याने वारंवार आपली घरे बदलली होती आणि युनानी डॉक्टर म्हणून त्याने अनेक मुस्लीम रुग्णांवर उपचार केले होते. या उपचाराच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या लोकांमध्ये तो अतिरेकी विचारांचा प्रचार करत असे. असे त्याने स्वतःच सांगितले.
शंभर अतिरेकी तयार केल्याचा भटकळचा दावा
पोलिसांसमोर जबाब देताना त्याने त्याच्यावर असलेले आरोप खरे असल्याचे मान्य केले. त्याशिवाय त्याने काही बॉम्बस्फोटाच्या घटनांमधील आपल्या सहभागाचे तपशीलसुध्दा सांगितले. तपास सुरू असताना पोलीस त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करत असत तेव्हा तो संतापलेला असे. मात्र शांत झाल्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असे. आपण जे काही केले आहे, आपण जे स्फोट घडवले आहेत ते एक संदेश देण्यासाठी घडवले आहेत असे सांगताना त्याने या कृत्याचा आपल्याला अजिबात पश्चात्ताप होत नाही असेही म्हटले.
यासीन भटकळचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या फोनवरून त्याने कोणाकोणाशी संपर्क साधलेला आहे. याचा शोध घेतला जाणार आहे. त्यातूनच त्याने इंडियन मुजाहिदीनचे जाळे कोठपर्यंत पसरवले होते याचा सुगावा लागणार आहे. त्याच्याजवळ एक मतदान ओळखपत्रसुध्दा सापडले. ते ओळखपत्र आणि त्याचा वाहतूक परवाना हाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याला अटक करण्याच्या कामात नेपाळच्या पोलिसांनी भरपूर सहकार्य केल्याचेही गुप्तचर यंत्रणांच्या अधिकार्यांनी आवर्जुन नमूद केले.
