बंगळुरु- युरोपमधील फ्रेंच गयाना येथून भारताच्या पहिला लष्करी उपग्रह जीसॅट-७ चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन देशांच्या एरियन स्पेस या अवकाश संस्थेच्या एरियन पाच या प्रक्षेपणास्त्राच्या सहाय्याने याचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह नौदलासाठी वापरण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ते कार्यरत होईल.
अडीच टन वजनाचा लष्करी उपग्रह प्रक्षेपित करुन भारताने अमेरिका, रशिया, फ्रान्स, इंग्लंड आणि चीन या पाच देशांच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावले आहे. यामुळे आगामी काळात नौदलाला सागरी संरक्षणासाठी फार मोठी मदत होणार असल्याचे समजते.
स्वदेशी बनावटीच्या २ हजार ६२५ किलो वजनाच्या या उपग्रहासाठी १८५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर त्याच्या प्रक्षेपणासाठी विम्यासह सुमारे ४७० कोटी रुपये खर्च झाला. फ्रेंच गयाना येथून शुक्रवारी पहाटे दोन वाजता जीसॅट-७ अवकाशात झेपावला. संपू्र्ण भारतासह आजूबाजूचा परिसरही या उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे. यामुळे नौदलाला सतर्कता राखून परिसरावर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे.