काश्मीरमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर- काश्मीरमधील गंडेरबल जिल्ह्यातील कंगन परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी हिझबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. ही घटना शुक्रवारी पहाटे गंदरबल जिल्ह्यातील प्रेंग भागात घडली. या परिसरात पोलिसांची गस्त चालू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला.

गंदरबल जिल्ह्यातील प्रेंग भागात चकमकीत हिझबुल मुजाहिदीन मधील कादरी असादुल्ला गटाच्या या पाचही दहशतवाद्यांना शुक्रवारी पहाटे ठार मारल्याचे सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

श्रीनगरपासून ६५ किलोमीटर अंतरावरील गंदरबल जिल्ह्यात २४ राष्ट्रीय रायफल आणि पोलिसांची गस्त चालू असताना प्रेंग भागात त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. जवानांनी त्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र दहशतवाद्यांनी न जुमानता पुन्हा गोळीबार केल्याने प्रत्त्युरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले.