कृत्रिम मेंदू तयार करण्यात यश

लंडन – ऑस्ट्रियातील काही शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्सपासून कृत्रिम मेंदू तयार केला आहे. हा पूर्ण आकाराचा मेंदू नसला तरी मेंदूची छोटी प्रतिकृती आहे आणि ती तयार करण्यात यश आल्यामुळे मेंदू संबंधी संशोधन करण्यास गती येणार आहे. सिझोफ्रेनिया किंवा ऑस्टिझम यासारखे मानसिक विकार का उद्भवतात आणि मेंदूत कोणते दोष निर्माण झाल्यामुळे उद्भवतात यावर संशोधन करण्यासाठी ही मेंदूची जिवंत प्रतिकृती उपयुक्त ठरणार आहे.

अशा प्रकारे मेंदूची जिवंत आणि त्रिमिती (थ्री डायमेंशनल) प्रतिकृती तयार करण्यात प्रथमच यश आले आहे आणि वैद्यकीय संशोधनात तो एक मैलाचा दगड मानला जात आहे. या प्रतिकृतीच्या निर्मितीमध्ये ऑस्ट्रियन तसेच ब्रिटीश संशोधकांनी मदत केलेली आहे. या प्रतिकृतीवरून पूर्ण वाढ झालेल्या मेंदूची निर्मिती करता येईल किंवा पूर्ण मेंदू तयार करता येईल असा काही दावा आपण करणार नाही कारण मानवी मेंदू फारच गुंतागुंतीचा आणि अजूनतरी १०० टक्के आकलनाच्या पल्याड आहे. असे ही प्रतिकृती तयार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

मानवी मेंदू ही या पृथ्वीतलावरची सर्वाधिक गुंतागुंतीची आणि अनेक प्रकारच्या प्रक्रिया एकाचवेळी घडणारी गूढ अशी वस्तू आहे. त्यामुळे असा मेंदू पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार करणे ही गोष्ट फार अवघड आहे. मात्र काही मानसिक विकृतींच्या संदर्भात संशोधन करण्यास उपयुक्त ठरेल एवढा तरी त्याचा भाग तयार करणे शक्य झालेले आहे. असे या संशोधकांनी सांगितले. हा मिनी मेंदू स्टेम सेल्सपासून तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्टेम सेल्सच्या संशोधनातसुध्दा तो मोठा मैलाचा दगड मानला जात आहे.