मुंबई – भारताच्या सध्याच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी शेवटी सरकारला सोन्याचाच विचार करावा लागत आहे आणि या विचाराचा एक भाग म्हणून सरकार सामान्य लोकांकडून सोने खरेदी करून ते विकण्याची योजना आखत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अशा रितीने सरकार हे सोने खरेदी करून ते सोन्याची विक्री करणार्या मोठ्या व्यापार्यांना उपलब्ध करून देईल आणि देशातले लोक ते सोने पुन्हा विकत घेतील. त्यामुळे आयात निर्यात व्यापारातील तोटा कमी होण्यास मदत होईल. असा विश्वास काही अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.
सरकार सोने विकत घेणार
भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील संकटाला सोन्याची आयात कारणीभूत आहे. २०१२ या एका वर्षातच भारतामध्ये ८६० टन सोने आयात केले गेले. देशात सध्या ३१ हजार टन सोने उपलब्ध आहे आणि त्याची किंमत १ हजार ४०० अब्ज डॉलर्स एवढी आहे. या सोन्यातील एक छोटा भाग खरेदी विक्रीसाठी वापरला गेला तर भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीवरचा दबाव बराच कमी होऊ शकतो. म्हणून काही कल्पक अर्थतज्ञांनी एक नवी कल्पना समोर मांडली आहे.
सरकारच्या ताब्यातील सोन्यापैकी ५०० टन सोने गहाण टाकणे किंवा विकणे असा एक उपाय सुचविला जात आहे. त्यामुळे भारताला सुमारे २४ अब्ज डॉलर्स प्राप्त होऊ शकतील. असे म्हटले जात आहे. परंतु भारतीय लोक सोने विकणे हे दिवाळखोरीचे लक्षण मानतात. त्यामुळे आपले सोने विकले तर लोकांमध्ये त्याची प्रतिकूल प्रतिक्रिया उमटेल अशी भीती सरकारला वाटते.
म्हणून काही अर्थतज्ञांनी हीच कल्पना वेगळ्या शब्दात मांडली आहे. सरकारने आपले सोने विकण्यापेक्षा लोकांचे सोने खरेदी करावे आणि सातत्याने सोने खरेदीची सवय असणार्या ग्राहकांना ते उपलब्ध करून द्यावे. अशा प्रकारे देशातलेच सोने देशातच उपलब्ध झाल्यास सोन्याची आयात कमी होईल आणि आयातीवर खर्च होणारे डॉलर्स वाचतील परिणामी डॉलरची मागणी कमी होईल आणि त्याची किंमतसुध्दा घटेल. शेवटी त्यामुळे रुपया मजबूत होईल.
भारताचा आयात-निर्यात व्यापारातील तोटा ही सरकारसाठी मोठी डोकेदुखी झालेली आहे. अशा प्रकारचा तोटा सहन करणार्या जगातल्या पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारताचा आयात-निर्यात तोटा ९० अब्ज डॉलर्स एवढा आहे.
