उ. कोरिया अध्यक्षांच्या मैत्रिणीला मृत्यूदंड

सिडने – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची मैत्रिण गायिका हियोन सॉंग-वूल हिला काल गोळ्या घालून ठार करण्यात आले. पोर्नोग्राफिक म्हणजे अश्‍लिल चित्रपटांच्या निर्मितीत सहभाग असल्यावरून हिला ही शिक्षा ठोठावण्यात आली. उत्तर कोरियामध्ये अश्‍लिल चित्रपट आणि साहित्यासंबंधीचा कायदा फार कडक आहे आणि या कायद्याचा भंग करणार्‍यांना दयामाया न दाखवता मृत्यूदंड दिला जातो.

काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियामध्ये अशा प्रकारचे अश्‍लिल चित्रपट तयार करून त्यांच्या चित्रफिती विकणारे एक रॅकेट उघड झाले होते. त्यामध्ये हियोन सॉंग-वूल हिचाही सहभाग होता. ती देशाच्या अध्यक्षांची मैत्रिण आहे परंतु तिलासुध्दा दयामाया न दाखवता शिक्षा देण्यात आली. स्वतःच्या शरीरसंबंधाचे चित्रीकरण करून त्याच्या चित्रफिती विकण्यास सॉंग-वूल हिने परवानगी दिली होती. तिच्यासोबत या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या ७ जणांना सुध्दा पकडण्यात आलेले होते.

त्यांची चौकशी केल्यानंतर त्यात आणखी पाच आरोपी सापडले. अटक झाल्याच्या तिसर्‍याच दिवशी या सर्वांना जाहीररित्या गोळ्या झाडून मारून टाकण्यात आले. सॉंग-वूल हिच्यासह बारा जणांना हा मृत्यूदंड देण्यात आला. त्याची अंमलबजावणी या सर्वांच्या नातेवाईकांच्या डोळ्यादेखत करण्यात आली. असे असले तरी काही लोकांच्या मते या शिक्षांचा प्रत्यक्षात त्या कायद्याशी काही संबंध नाही. अध्यक्ष किम जॉंग-उन याला आपल्या सत्तेला आव्हान देणारे लोक नको आहेत आणि हे सर्व लोक तसे आव्हान देतील अशी भीती जॉंग-उन याला वाटत होती. त्यामुळे या कायद्याचे निमित्त करून या सर्वांना संपवण्यात आले आहे. असे या लोकांचे मत आहे.