नवी दिल्ली – एखादे मूल काही असाधारण गुण घेऊन जन्माला येतो. त्याची वाढ किंवा वर्तन सर्वसाधारण मुलांसारखे नसते. एखादे मूल ८ वर्षाचे असते परंतु त्याच्या शरीराची वाढ ८० वर्षांच्या माणसासारखी झालेली असते. या असाधारण विकाराला प्रोजेरिया असे म्हणतात. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या पा या चित्रपटामध्ये अशा मुलाची कथा दाखवली आहे. त्याशिवाय या विकाराने त्रस्त झालेल्या मुलांवर काही कथाही लिहिल्या गेल्या आहेत. साधारणपणे लाखात एका मुलाला असा विकार होतो असे म्हटले जाते. परंतु बिहारमध्ये एका कुटुंबात अशी ६ मुले जन्माला आलेेली आहेत.
प्रोजेरियाग्रस्त कुटुंबाची व्यथा
अली हुसेन खान नावाचा १४ वर्षाचा मुलगा आज ८० वर्षाच्या वृध्दासारखा दिसत आहे. त्याच्या शरीराची वाढ वयापेक्षा ८ पटींनी जास्त झालेली आहे. अशा प्रकारचा विकार हा दुर्मिळ समजला जात असला तरी बिहारमधल्या या कुटुंबात मात्र बहुतेक मुलांना तो झालेला आहे. नबी हुसेन खान (वय-५०) आणि त्याची पत्नी रजिया (वय-४६) यांना आजपर्यंत ८ मुले झाली मात्र त्यातल्या दोन मुली वगळता सहाही मुलांना प्रोजेरिया झालेला होता. त्यातील ५ मुले मरण पावली आणि अली हुसेन खान हा मात्र जगला. तो आता १४ वर्षांचा आहे.
एखादे मूल हा विकार घेऊन जन्माला आले असेल तर त्याची चिन्हे ते काही महिन्याचे असतानाच दिसायला लागतात आणि त्याच्या शरीरातील अंतर्गत अवयवांची वाढ भराभर व्हायला लागते. त्याच्या शरीराची उंची मात्र वाढत नाही. मात्र ते मूल १ वर्षाचे असतानाच १० वर्षाच्या मुलासारखे दिसायला लागते आणि ते जेव्हा १० वर्षाचे असताना वृध्दासारखे दिसायला लागते. अशी मुले फार दिवस जगत नाहीत साधारण २० वर्षांची होईपर्यंतच मरतात.
