वॉशिंग्टन – अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेले राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅममध्ये विजयी सलामी दिली. दुसर्याे सीडेड नदालने पुरुषांच्या एकेरीत रायन हॅरीसनचा ६-४, ६-२, ६-२ असा फडशा पाडला. दुसरीकडे महिला एकेरीत नंबर वन सीडेड सेरेनाने फ्रान्सेस्का शिवोनचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवला.
सर्वाधिक १७ वेळा ग्रॅण्डस्लॅम जिंकणार्या रॉजर फेडररला विजयासाठी मंगळवारपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. फेडरर आणि स्लोव्हेनियाचा ग्रेगा झेमला यांच्यामधील लढतीत पावसाने व्यत्यय आणला. दरम्यान, रिचर्ड गासकेट, दिमित्री तुर्सुनोव, ब्रॅडली क्लॅन, डुडी सेला, यान्को टिपसेरविच, टॉमी रोब्रेडो, बर्नाड टोमीच, निकोलाय डेव्हिडेन्को, फेलिसियानो लोपेज व डेव्हिड फेरर यांनी पुरुषांच्या एकेरीत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पुढे पाऊल टाकले.
अमेरिकेचा टेनिसपटू जेम्स ब्लेकने सोमवारी आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. सध्या मायदेशात सुरू असलेल्या अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅमनंतर तो टेनिसला अलविदा करणार आहे.