सोन्यानं गाठली बत्तीशी

मुंबई – एकीकडे शेअर बाजार आणि रुपयाला उतरती कळा लागली आहे. तर दुसरीकडे सोन्याने मात्र बत्तीशी गाठली आहे. सोन्याने रेकॉर्ड करत 32 हजार 526 एवढा भाव खाल्ला आहे. आता 10 ग्रामसाठी तुम्हाला 32 हजार 526 रुपये मोजावे लागणार आहेत. 28 जूनला 25 हजार 130 पर्यंत कमी झालेला सोन्याचा दर पुन्हा 26 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे सराफा बाजारात सोनं विकणार्‍यांची संख्याही वाढताना दिसत आहे.

आयातदारांकडून अमेरिकी डॉलरला मोठी मागणी आणि परकीय गुंतवणूकदार संस्थांकडून देशातून काढून घेतलं जाणारं भांडवल, यामुळे रुपयाचे मूल्य आज सकाळी पुन्हा घसरले. अमेरिकी डॉलरचं बळ वाढत चालल्याने, रुपयाचे मूल्य 65 च्या पुढें जावून ते 65.70 रुपये एवढें झाले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 500 अंशांची घसरण पहायला मिळाली. त्याचाच परिणाम की काय सोन्याचा भाव मात्र गगनाला भिडत आहे.