
मुंबई : दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री मुंबईतील दहिसर पश्चिमेकडील विठ्ठल मंदिराजवळील चौकात बांधलेल्या वारकऱ्यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होत होता. परिसरातील अनेकांना या घटनेनंतर प्रश्न पडला होता की, कुणी असे का केले असेल किंवा तोडफोड करणाऱ्यांनी काय साध्य केले. या घटनेबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच अखेर आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
दहिसरमधील वारकरी पुतळ्यांची तोडफोड करणाऱ्या तळीरामांची मस्ती पोलिसांनी उतरवली
पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींना पकडले आहे. या सीसीटीव्हीमध्ये एका स्कुटीवरुन आलेले तिघांपैकी दोघेजण खाली उतरुन या पुतळ्यांची विटंबना करताना दिसत आहेत. हे शिल्प ज्या चौकात उभारण्यात आले आहे त्याठिकाणी ही स्कूटी थांबल्याचे दिसत होते. त्यानंतर मागील बाजूस बसलेली व्यक्ती स्कुटीवरुन उतरते. या व्यक्तीसोबत असणारे इतर दोघेजण पुतळ्याची विटंबना करताना दिसत आहेत. यामध्ये एकजण पुतळ्यामधील वारकऱ्याची मुर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
एमएचबी पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान यातील आरोपी मुंबईतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विघ्नेश हेगडे (30), अमर चित्तोरिया (25), संजय गारू (30) यांना बोरीवली येथून अटक केली. दरम्यान नशेच्या अवस्थेत असताना आरोपींनी पुतळा तोडल्याची माहिती दिली. सदर तिन्ही आरोपी दहिसरचे रहिवासी आहेत. या आरोपींपैकी अमर चित्तोरिया याच्याविरुद्ध यापूर्वी देखील 2 गुन्हे दाखल आहेत. या तीन आरोपींना एमएचबी पोलिसांनी 48 तासांच्या आत अटक केली आहे.
