श्रीजेशच्या बचावमुळे हॉकीत भारत सेमीफायनलमध्ये

इपोह- गोलकीपर श्रीजेशच्या बचावामुळे गतविजेत्या दक्षिण कोरिया संघाला भारताने २-०ने धूळ चारली. त्यामुळे भारताने आशियाई हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता किताबी लढतीत भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. आशियाई चषकाचा गतविजेता असलेल्या दक्षिण कोरियाच्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने २-० ने धूळ चारली आणि सगळ्यांनाच आश्चार्याचा धक्का दिला.

सामना सुरू होताच सहाव्या मिनिटाला व्ही. आर. रघुनाथ याने दक्षिण कोरियाला पहिला धक्का दिला. यावेळी भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचे रूपांतर रघुनाथने जोरदार फटका मारत गोलच्या रूपात केले. यानंतर मात्र भारताच्या संघाने बचावात्मक खेळ केला. या दरम्यान दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी हिंदुस्थानी संघावर सतत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले असतानाही गोलकीपर पी. आर. श्रीजेश याच्याह बचावामुळे एकाही गोलमध्ये रूपांतर दक्षिण कोरियाला करता आले नाही.

त्यानंतर ६५व्या मिनिटाला मनदीपसिंगला दक्षिण कोरियावर दुसरा गोल करण्यात यश आले. ही आघाडी कायम राखतच भारताने हा सामना जिंकला. गोलकीपर पी. आर. श्रीजेश याने दक्षिण कोरियाचे ७ हल्ले परतवून लावत भारताच्या आघाडीला खिंडार पडू दिले नाही. याचमुळे त्याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. पहिल्या सत्रामध्ये भारताने तीन पेनल्टी कॉर्नर दक्षिण कोरियाला दिले; पण पी. आर. श्रीजेशच्या पहाडासारख्या कामगिरीपुढे कोरियाची काही चालले नाही. आता भारताची लढत उपांत्य फेरीत बांगलादेशसोबत होणार आहे.