‘या’ शेअरमधून ३ दिवसात राकेश झुनझुनवाला यांनी कमावले ३१० कोटी रुपये


नवी दिल्ली – गेल्या काही काळात शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती चांगलीच वाढली आहे. त्याचे कारण म्हणजे झुनझुनवाला यांनी नाझारा टेक, टायटन कंपनी, टाटा मोटर्स सारख्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे आहे. टाटा मोटर्सच्या शेअर किमतीचा इतिहास पाहता, या शेअरमधून फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी ३१० कोटी रुपये कमावले आहेत.

टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ६ ऑक्टोबर २०२१ रोजी ३३५.६० रुपये होती, जी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये वाढून ४१७.८० रुपये झाली. म्हणजेच, टाटा मोटर्सचे शेअर्स अवघ्या तीन दिवसात २५% पर्यंत चढले. टाटा मोटर्समध्ये राकेश झुनझुनवाला यांचा १.१४% हिस्सा आहे. त्यानुसार, त्यांनी फक्त तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये ३१० कोटी रुपयांचा नफा कमावला.

सोमवारी, BSE वर ७.३९ टक्क्यांच्या वाढीसह तो ४११.२५ रुपयांवर व्यवहार करत होता. दुसरीकडे, टाटा मोटर्स DVR चे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढीसह २०१.१० रुपयांवर बंद झाले. जून २०२१ च्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे एकूण ३,७७,५०,००० शेअर्स होते. हे कंपनीच्या एकूण १.१४% हिस्सेदारीच्या बरोबरीचे आहे. यापूर्वी मार्च २०२१ च्या तिमाहीत, झुनझुनवालाकडे टाटा मोटर्सचे ४,२७,५०,००० शेअर्स होते. जून तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांनी टाटा मोटर्समधील हिस्सा कमी केला होता.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे. विनय दुबे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

ज्यावेळी बहुतांश विमान कंपन्या तोट्यात आहेत त्या वेळी राकेश झुनझुनवाला हे नवीन विमानसेवा सुरू करत आहे. अनेक खासगी विमान कंपन्यांच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली आहे. याशिवाय ते अनेक मोठ्या तज्ज्ञांचे मतही घेत आहे. आकासा विमान कंपनीने प्रवाशांना नवीन मार्गाने प्रवास करण्याचा दावा केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांची विमाने अगदी लहान विमानतळांवरही सहज उतरू शकतील. अलीकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत झुनझुनवाला यांनी आकासामध्ये ४० टक्के भागभांडवल असल्याचे सांगितले होते. या कंपनीकडे पुढील चार वर्षात १८० आसन क्षमतेची ७० विमाने असतील.