रासायनिक हल्ल्याच्या चौकशीस सीरियाचा हिरवा कंदील

दमास्कस – सीरियामधील यादवी युद्धामध्ये विषारी वायू व रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सीरियाने आज (सोमवार) परवानगी दिली . गेल्या आठवड्यात दमास्कसजवळ विषारी वायू आणि रासायनिक शस्त्रांचा वापर करून शेकडो आंदोलनकर्त्यांना ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सीरियातील बाशर अल असद यांच्या राजवटीस संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परवानगी मागितली होती. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रसंघाच्या तपासणी पथकाकडून करण्यात येणार आहे.

राष्ट्रसंघाच्या तपासणी पथकास सीरियात प्रवेश मिळावा, यासाठी रविवारी सीरियात आलेल्या राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधी अँजेला केन यांना बान की मून यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. अखेर सीरिया राजवटीकडून राष्ट्रसंघाला चौकशीसाठी परवानगी देण्यात आली आहे. बंडखोरांनी वर्चस्व तयार केलेल्या जिल्ह्यांमध्ये लष्कराने केलेल्या हल्ल्याचा बंडखोरांचा दावा खरा ठरला तर सीरियात दोन वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धात विषारी वायूच्या हल्ल्याची ही सर्वांत मोठी घटना ठरणार आहे. दमास्कसची उपनगरे ऐन तारमा, झमालका आणि जोबार या भागांमध्ये रासायनिक घटक असलेली क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचा बंडखोरांचा दावा आहे.