इपोह – नवव्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत ‘बी ग्रूप’मध्ये भारताची सोमवारी गतविजेते दक्षिण कोरियाविरुद्ध लढत होणार आहे. ही लढत जिंकल्यास भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करता येईल. मात्र पराभूत झाल्यास गटवार साखळीतील शेवटच्या लढतीत दुय्यम संघ बांगलादेशवर विजय मिळवावा लागेल. ओमानवर मोठा विजय मिळवणा-या भारताचे पारडे जड झाले आहे.
सध्या दक्षिण कोरिया सध्या भन्नाट फॉर्मात आहे. अर्जेटिनातील पॅन अमेरिकन कॉन्टिनेन्टल स्पर्धा जिंकून पुढील वर्षी हॉलंडमध्ये होणा-या हॉकी वर्ल्डकपसाठी ते पात्र ठरले आहेत. वर्ल्डकपसाठी पात्र ठरणारा यंदा आशियाचा तो पहिला देश ठरला आहे. ते पाहता दक्षिण कोरियाच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देण्याची कामगिरी भारताच्या तुलनेने अनुनभवी संघाला करावी लागेल. द. कोरियाची ताकद भारताचे हंगामी प्रशिक्षक रोलॅँट ओल्टमन्स यांनी देखील ओळखली आहे.
जमेची बाजू म्हणजे या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या आठ लढतींमध्ये भारताने पाच लढती जिंकल्या आहेत. मात्र सर्व स्पर्धामधील लढतींमध्ये कोरियाची बाजू वरचढ आहे. एकूण ६८ सामन्यांत त्यांनी सर्वाधिक ३० विजय मिळवले आहेत.
ओमानवर आठ गोल करता आले असले तरी पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवण्यात भारताला अपयश येत असल्याचे दिसले. तापाच्या आजारातून हळूहळू बाहेर येणारा कर्णधार आणि मिडफिल्डर सरदार सिंगकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारताची बचावफळी कशी कामगिरी करते, यावर सारे काही अवलंबून आहे. गोलकीपर आणि उपकर्णधार पी. आर. श्रीजेशवरच्या कामगिरीवर भारताचे यशापयश ब-यापैकी अवलंबून आहे.