नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांमध्ये शंका आहेत. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान कोण्या एका पक्षाकडून भाषण करत नाहीत. ते देशाचे प्रमुख नेते म्हणून भाषण करतात. तरीही या अत्यंत महत्वाच्या दिवशी मोदींचे भाषण संकुचित राजकारण करणारे होते, अशी टीका केंद्रीय कंपनी व्यवहारमंत्री सचिन पायलट यांनी केली.
सचिन पायलट म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे आत्ममग्न असून त्यांना पंतप्रधान पदाच्या आकांक्षेने पछाडलेले आहे.गुजरातच्या विकासाचा गाजावाजा करून मोदी देखावा निर्माण करत आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करून हिंदूत्वाचा छुपा अजेंडा राबवण्याचीच मोदींची मुख्य भूमिका आहे.’
देशातील जनता आता भावनिक मुद्दय़ांच्या पलिकडे पहाण्यास शिकली आहे. भारत हा मध्यमवर्गीयांचा आणि आधुनिक विचारांच्या युवकांचा देश बनला आहे. त्यांना मंदिर आणि मशिदीपेक्षा महाविद्यालये हवी आहेत, असेही यावेळी बोलताना पायलट यांनी स्पष्ट केले.