आंध्रप्रदेशचे बारा खासदार निलंबित

नवी दिल्ली – स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती करण्याच्या निर्णया विरोधात संसदेत वारंवार गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखून धरणा-या आंध्रप्रदेशच्या बारा खासदारांना लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी शुक्रवारी पुढच्या पाच सत्रांसाठी निलंबित केले.

पाच ऑगस्टला संसदेचे अधिवेशन चालू झाल्यापासून हे खासदार वारंवार संसदेच्या कामकाजात अडथळा आणत होते. निलंबित करण्यात आलेल्या बारा खासदारांमध्ये काँग्रेसचे आठ तर टीडीपीच्या चार खासदारांचा समावेश आहे. हे सर्व खासदार आंध्र आणि रायलसीमा भागातील आहेत.

सभागृहाचे कामकाज सुरु होताच, तेलंगणच्या निर्मितीवरुन या खासदारांची घोषणाबाजी सुरु केल्याने, दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी, मीरा कुमार यांनी या बारा खासदारांना निलंबित केले.

लोकसभेच्या नियम 374 (अ) अंतर्गत लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई केली. या नियमानुसार संबंधित खासदार सलग पाच सत्रांसाठी किंवा उर्वरित अधिवेशन संपेपर्यंत निलंबित होतो. तसेच या नियमामध्ये कधीही प्रस्ताव आणून निलंबन रद्द करण्याचीही तरतुद आहे.