नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मद्रास कॅफे’ सिनेमाला तामीळ भाषिकांनी जोरदार विरोध दर्शवला होता. या पार्श्व भूमीवर शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात `मद्रास कॅफे’ हा सिनेमा तमिळनाडू सोडून देशभरात सर्वत्र रिलीज झाला आहे. तमिळनाडु फिल्म एक्जिबिटर्स असोसिएशनने शुक्रवारी सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता जॉन अब्राहमची निर्मिती असलेला `मद्रास कॅफे` हा चित्रपट भारताची गुप्तचर यंत्रण रिसर्च अँड अॅनालिसीस विंग (रॉ)च्या कार्यपद्धतीवर आधारीत आहे. श्रीलंकेतील १९९०ची अंतर्गत बंडाळी आणि त्यातील भारताची भूमिका हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे. श्रीलंकेच्या हल्ल्यात मारला गेलेला प्रभाकरन यांची व्यक्तिरेखा यात नकारात्मक दाखविण्यात आली आहे. तसेच तामिळी संघटनांना उल्लेख सिनेमात दहशतवादी असा करण्यात आल्यामुळे तामीळ संघटनांनी या सिनेमाला विरोध केला आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणणारा एलटीटीईचा प्रमुख प्रभाकरन याची व्यक्तिरेखा नकारात्मक दाखविणा-या `मद्रास कॅफे` या आगामी सिनेमाला भाजपनेही विरोध दर्शवला होता. या सिनेमामुळे तामिळ भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात, त्यामुळे सिनेमावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, सिनेमात असा कोणताही उल्लेख नसल्याचे दिग्दर्शक सुजीत सरकार आणि अभिनेता जॉन अब्राहमचे म्हणणे आहे.