अर्जुनने घेतली घराकडे धाव

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवुडमधल्या कुटुंबप्रेमी अभिनेत्यांमध्ये अर्जुन रामपालचे नाव आवर्जून घेतले जाते. एक चांगला नवरा आणि पिता म्हणून सर्व जण त्याचे कायम कौतुक करीत असतात. नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगानंतर त्याचे आपल्या कुटुंबावरचे प्रेम परत दिसून आले. मुलीची तब्येत खूप खराब झाली असल्याचे समजल्यानंतर अर्जुनने सिनेमाच्या प्रमोशनचे काम तात्काळ सोडून घराकडे धाव घेतली.

गेल्या काही दिवसांपासून अर्जुनच्या आगामी काळात येत असलेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमाचे प्रमोशन सध्या सुरू आहे. तर या प्रमोशनअंतर्गतच सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ऑफिसमध्ये बसून अर्जुन मीडियाला मुलाखत देत होता. इतक्यात त्याच्या बायकोचा मेहेरचा फोन आला आणि अर्जुन अक्षरशः घरी पळतच सुटला.

काय झाले हे कुणालाच कळेना. थोड्या वेळाने समजले, की त्याच्या मुलीची तब्येत खूप खराब झाली आहे. म्हणूनच अर्जुनने तात्काळ घराकडे धाव घेतली. मुलीची नीट काळजी घेतल्यावर अर्जुनने परत कामाला सुरुवात केली. त्यामुळेच कुटुंबप्रेमी अभिनेत्यांमध्ये अर्जुन रामपालचे नाव आवर्जून घेतले जाते.