जम्मू – पाकिस्तानीच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नसून जम्मु – काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत दोन वेळा गोळीबार केला. भारतीय सैन्याने त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून आता जवळपास दररोजच शस्त्रसंधीचे उल्लंघ होत आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचा करार निरर्थक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पाककडून पूंछमध्ये गोळीबारी सुरूच
भारताने इशारा देऊनही पाकिस्तानी लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच असून, बुधवारी रात्री दोनवेळा पाकिस्तानने पूंछ क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पूंछमधील हमीरपूर भागातील काही भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी रात्री 9.30 वाजता जोरदार गोळीबार केला. त्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास मेंढर येथील चौक्यांवरही पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. दोन्ही घटनांना भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दोन्ही ठिकाणच्या चकमकी सुमारे तासभर चालल्या असल्याची माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल आर के पालता यांनी दिली. पाकिस्तानी सैनिकांनी स्वयंचलित बंदुका तसेच काही प्रमाणत तोफांचाही वापर केल्याचे समजते. या हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
2003 पूर्वी सीमेपलीकडून जसा गोळीबार व्हायचा तसाच गोळीबार आता रोज सुरु आहे. पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या या हल्ल्यांमुळे 2003 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये झालेला शस्त्रसंधीचा करार निरर्थक ठरत आहे. पूंछ-राजौरी सीमेवर 10 ऑगस्टपासून दररोज गोळीबार सुरु आहे. या महिन्यात 28 वेळा तर जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानने तब्बल 80 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
