रासायनिक हल्ल्यातील बळींच्या आरोपांचे स्पष्टीकरण द्या

संयुक्त राष्ट्रे- सीरियाच्या लष्कराने रासायनिक शस्त्रांचा वापर करून 1300 बळी घेतल्याच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांनी सीरियाकडे केली आहे. सीरियाची राजधानी दमास्कसच्या बाहेर सरकारच्या फौजांनी रासायनिक शस्त्रांचा वापर करून सुमारे 1300 बळी घेतल्याचा आरोप सीरियामधील सरकारविरोधी गटाने केला होता. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली व सीरियामधील कथित रासायनिक हल्ल्याची ताबडतोब चौकशी करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

सीरियावर होत असलेल्या या आरोपांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि जे घडले त्याबाबत स्पष्टीकरण मिळालेच पाहिजे आणि या परिस्थितीची हाताळणी अतिशय काळजीपूर्वक झाली पाहिजे, अशी सदस्यांची भावना आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या अध्यक्ष मारिया क्रिस्टिना पर्सेवल यांनी व्यक्त केले आहे.