
वॉशिंग्टन- शिक्षणाच्या नावाखाली पैसे गोळा करुन मिळालेला मदत निधी दहशतवादी संघटनांना पुरवणा-या पाकिस्तानमधील पेशावर येथील गंज मदरशावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.

वॉशिंग्टन- शिक्षणाच्या नावाखाली पैसे गोळा करुन मिळालेला मदत निधी दहशतवादी संघटनांना पुरवणा-या पाकिस्तानमधील पेशावर येथील गंज मदरशावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत.
पाकिस्तानातील अल कायदा आणि लष्कर ए तोयबा या खतरनाक दहशतवादी संघटनांना मदत पुरवल्याप्रकरणी जमिया तालीम-उल-कुराण-वल-हदीत मदरसा उर्फ गंज मदरसा’ या मदरशावर अमेरिकेने निर्बंध घातले आहेत. अल कायदा, लष्कर ए तोयबा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांसाठी हा मदरसा प्रशिक्षण केंद्राचे काम करत असल्याचे अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात सांगितले आहे.
या कारवाईमुळे अमेरिकेच्या नागरिकांना या मदरशाबरोबर कोणत्याही स्वरूपाचा व्यवसाय तसेच अमेरिकेच्या न्यायक्षेत्रात कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मदरशातून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना रसदही पुरवण्यात येते. मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही याच मदरशातून मदत केल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
गंज मदरशाचा प्रमुख फझील- ए- तुल शेख अबु मोहम्मद अमीन अल- पेशावरी उर्फ शेख अमिनुल्लाह याला अल कायदा आणि तालिबान या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्या प्रकरणी अमेरिकेने 2009 मध्येच दहशतवादी घोषित केले आहे. दरम्यान, या मदरशाने अमेरिकेने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
येथील मुस्लिम शाळांमधून मुलांना आत्मघातकी बाँब बनवण्याचे शिक्षण दिले जात नसल्याचे म्हटले आहे. तसेच शेख अमिनुल्लाह हा या मदरशात फक्त शिक्षक म्हणून नोकरी करत होता, मात्र त्याचे नाव फरार घोषित केलेल्या आरोपींच्या यादीत नाव असल्याने नोव्हेंबर 2012 पासून तो येथे आला नसल्याचे सांगितले.