बिहारमध्ये रेल्वे धडकेत 35 ठार, 30 जखमी

पाटणा – बिहारमध्ये सहरसा-पाटणा राज्यराणी एक्सप्रेसने दिलेल्या धडकेत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 ते 30 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता रेल्वे प्रशानाकडून वर्तविण्यात आली आहे. अपघातामुळे पाटणाकडे जाणारी रेल्वेसेवा बंद कऱण्यात आली आहे. रेल्वेच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे.

श्रावणी सोमवार असल्याने इथल्या एका प्रसिद्ध देवस्थानाकडे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने निघाले होते. यामुळे कात्यायनी रेल्वेस्थानकात गाडी पकडण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. तर काही भाविक रेल्वे रुळ ओलांडत होते. त्यावेळी रुळांमध्ये उभ्या असलेल्या भाविकांना भरधाव वेगाने आलेल्या राज्यराणी एक्स्प्रेसने चिरडले. सहरसा रेल्वेस्थानकाजवळ खगडिया भागात ही भीषण दुर्घटना घडली आहे.

या भीषण अपघातात 35 जण ठार झाले असून सुमारे 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अपघात ग्रस्तांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने रेल्वेवर दगडफेक केली.