अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्वाचा अंतिम निर्णय


मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा-मनसे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. जागांसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये महत्वाचा अंतिम निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

५ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील १४४ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून बहुतेक उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. सोमवारी रात्री उशीरा कपिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.

भाजपा-मनसेमध्ये थेट युती झाली नसली, तरी आम्ही जागांसंदर्भात चर्चा केली असून जागा व्यवस्थापनाबद्दल दोन्ही पक्षांनी समहती दर्शवली आहे. भाजपचा प्रभाव ज्या ठिकाणी जास्त आहे, तिथे मनसे उमेदवार देणार नाही आणि जिथे मनसेचा दबदबा आहे, तिथे भाजप उमेदवार देणार नसल्याचे निश्चित करण्यात आल्याचे कपिल पाटील म्हणाले आहेत. मनसेसोबत विकास आणि चांगल्या कामांसाठी जाण्यास काय हरकत आहे?, असा प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

भाजप-मनसेने ही अॅडजेस्टमेंट नक्की किती जागांवर केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून येत्या काळात हे स्पष्ट होईल, असे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान पालघरचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांनी भाजप आणि मनसे एकमेकांविरोधात उमेदवार देणार नसल्याचे सांगितले आहे. पोटनिवडणुकीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान त्यापैकी दोन अर्ज बाद ठरवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० अर्ज कायम आहेत.

निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसतर्फे बहुतांश सर्वच जागांवर उमेदवारी दाखल करण्यात आली असून, बहुजन विकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवारदेखील रिंगणात आहेत. यामुळे निवडणुका अनेक ठिकाणी बहुरंगी होणार आहेत. उमेदवारी अर्ज करायच्या अखेरच्या दिवसापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरिता आठवड्याभराचा अवधी लाभल्यामुळे हा वेळ वाया न दवडता बहुतांश सर्व उमेदवारांनी आपल्या मतदार क्षेत्रामध्ये प्रचाराचा पहिला दौरा पूर्ण केला आहे.

उमेदवारांना आपले निवडणूक चिन्ह तसेच मतदान प्रक्रियेतील क्रमवारी प्राप्त झाली नसल्यामुळे मतदारांना देण्यात येणारे छापील साहित्य अजूनही तयार झाले नसल्यामुळे वैयक्तिक भेटीगाठी, परिसरातील समस्या जाणून घेण्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच गाव पाड्यावरील समूहांच्या बैठका घेण्याचे, मोटरसायकल रॅली काढण्याचे देखील काही भागांमध्ये सुरू झाले आहेत.

उमेदवारांना या पोटनिवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी अवघ्या आठवडाभराचा अवधी मिळणार असल्यामुळे तसेच मतदारसंघ विखुरलेले असल्यामुळे सर्वच ठिकाणी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. अद्यापही या भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक ठरत आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या या कालावधीत पंचायत समितीच्या १४ जागांसाठी २२ उमेदवारांनी, तर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ५१ उमेदवारांनी उमदवारी अर्ज मागे घेतले असून जिल्हा परिषदेसाठी ७४, तर पंचायत समितीसाठी ७० उमेदवार रिंगणात आहेत.