नवी दिल्ली- नुकताच एका वृत्तवाहिनीने जनमताचा कानोसा घेतला आहे. आत्ता जर निवडणुका झाल्या तर यूपीए अथवा एनडीएही नाही, तर तिसरी आघाडी बहुमताच्या आकड्याच्या सर्वात जवळ असेल असा निष्क ष काढला आहे. अशावेळी समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव पंतप्रधानपद होवु शकतात, असा दावा वृत्तवाहिनीने केला आहे. त्या मुळे आगामी काळात नरेंद्र मोदीं आणि राहूल गांधीसाठी दिल्ली दूरच राहणार असे दिसते.
इंडिया टुडे-सी वोटरने आगामी लोकसभा तसेच पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेचा कौल कोणाला असेल, याचा अंदाज घेतला. त्यात सद्यस्थितीत निवडणुका झाल्या तर काँग्रेसला मजबूत झटका बसेल. सध्याचा देशाचा मूड पाहता २०१३ मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला त्याचा फायदा होईल. त्याचवेळी काँग्रेसविरोधी लाटेचा सरळ फायदा यूपीए-एनडीए बाहेरच्या पक्षांना मिळेल. या पक्षांचे संख्याबळ २५१ पर्यंत पोहोचेल. हा आकडा बहुमताच्या अगदी जवळचा असेल. २००९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत यूपीएला २५९ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता निवडणुका झाल्या तर हा आकडा थेट १३७ एवढा खालपर्यंत गडगडेल. तब्बल १२२ जागांचा फटका यूपीएला बसेल. दुसरीकडे एनडीएला १५९ जागांपर्यंतच मजल मारता येईल. २००९ च्या तुलनेत त्यांना केवळ चार जागांचाच फायदा होईल.
जनमत चाचणीनुसार तिसऱ्या आघाडीच्या हातात सत्तेच्या चाव्या जाणार आहेत. यूपीए, एनडीए वगळून अन्य पक्षांना २५१ जागा मिळणार असतील तर अशावेळी समाजवादी पक्ष या तिस-या आघाडीत सर्वात मोठा घटक पक्ष असणार आहे. त्यामुळे मुलायम सिंग यादव हेच किंगमेकर असतील व पंतप्रधानपदासाठी ते प्रबळ दावेदार ठरतील. सर्वेक्षणानुसार १३ जागांचा फायदा होऊन सपाच्या खासदारांची संख्या ३४ वर पोहोचेल.
पाच राज्यांच्या विधानसभा निवणुकांमध्ये काँग्रेसविरोधी लाटेचा मोठा फायदा भाजपला मिळणार आहे. मध्य प्रदेशात भाजपच्या २१ जागा कमी होतील मात्र २३० पैकी १२२ जागा जिंकून शिवराज सिंह चौहान हॅट्ट्रीक करतील. दिल्लीत ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत काँग्रेस आणि भाजपला २८-२८ जागा मिळून सामना ‘टाय’ होईल. छत्तीसगडमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार आहे. भाजपच्या ५ जागा घटतील पण, ९० मधील ४५ जागा जिंकून भाजप सत्तेचा मार्ग चोखाळेल, तर काँग्रेसच्या चार जागा वाढूनही ४२ पर्यंतच मजल मारता येईल. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे शिंदे यांचा पुन्हा कम बॅक होणार आहे. भाजप १९ जास्त जागा जिंकून ९७ जागांची कमाई करेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय प्रथमच निवडणुकांना सामोरे जात असताना शिवसेनेचे महाराष्ट्रातील बळ आणखी वाढणार असे अंदाज बांधण्यात आले आहेत. राज्यात काँग्रेसची पिछेहाट होईल तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधी लाटेचा सर्वात जास्त फायदा सेनेला मिळेल, असे नमूद करण्यात आले आहे.