आता पाकिस्तानची घुसखोरी कारगिलमध्ये

नवी दिल्ली – पाकिस्तानी सैन्याने गेल्या दहा दिवसातील घुसखोरीच्या आणि गोळीबाराच्या प्रकारात आता बदल केला असून जम्मू काश्मीरच्या सीमेवरील पूँछ भागात आजवर केंद्रित केलेला हल्ला आता कारगिल भागात सुरू केलेला आहे. शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी जवानांनी कारगिल-द्रास विभागातील भारताच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार सुरू केला. १९९९ साली याच भागामध्ये त्यांनी केलेल्या घुसखोरीवरून भारत-पाकिस्तान युध्द झाले होते. आता १४ वर्षानंतर पाकिस्तानने पुन्हा याच भागाला लक्ष्य केले आहे. १९९९ साली या युध्दात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता.

कारगिल-द्रास भागामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यामुळे बर्फ वृष्टीच्या काळात दोन्हीपैकी कोणत्याच देशाने या भागात येऊ नये असा उभयपक्षी करार झालेला होता आणि स्वातंत्र्यापासून तो दोघांनीही पाळला होता. परंतु १९९९ साली दगाबाजी करून पाकिस्तानने या भागात सैन्य घुसविले त्यावेळी भारतीय फौजा बेसावध होत्या. म्हणून पाकिस्तानला या भागातून हाकलून लावण्यात थोडा उशीर झाला. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी सुरू केली आहे.

यावेळी मात्र भारतीय सेना सावध आहेत आणि त्यांनी कारगिल मधल्या घुसखोरीला सडेतोड उत्तर दिलेले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य हतबल झाले आहेत. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भारतीय बाजूने कोणी जखमी झालेले नाही.