नवी दिल्ली- देशाची अंतर्गत सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडत्वावर संकट आल्यास ते जपण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, त्यामुळे भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी पाकिस्तानला खडसावले.
सहनशीलतेचा अंत पाहू नका- राष्ट्रपती
67 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली. शेजारच्या राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी भारताने सातत्याने प्रयत्न केले. मात्र तरीही नियंत्रणरेषेवर नेहमी तणावाचे वातावरण आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शांतता कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, मात्र आमच्याही सहनशीलतेला मर्यादा आहेत, असे मुखर्जी म्हणाले.
देशाची आंतरिक दक्षता घेताना आपल्या सुरक्षारक्षकांनी निर्भयता व धैर्य दाखवत मोठे त्याग केले आहेत, असे म्हणत त्यांनी भारतीय जवानांची प्रशंसा केली. गेल्या काही वर्षात देशांतर्गत व बाहेरील संकटांनी सुरक्षेचे मोठे आव्हान उभे केले आहे. छत्तीसगढमध्ये माओवाद्यांनी केलेला नृशंस हिंसाचार हे त्याचेच प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले.
संसदेतील कामकाजामध्ये अलीकडच्या काळात होणा-या गोंधळाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही सभागृहे अलीकडे कायदे तयार करणा-या संस्थांपेक्षा संघर्षाची ठिकाणे वाटतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचार ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची महत्त्वाची संसाधने भेदभाव व असहिष्णुतेच्या मार्गाने वाया जात असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.
