कोरोनाबाबत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे अजब वक्तव्य


सातारा : आपल्या बेधडक वक्तव्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेली वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. पण उदयनराजे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज्यासह देशात गेल्या जवळपास दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून सावधानतेचा इशारा दिला आहे. असे असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केले आहे. आपल्या जन्माच्या अगोदरपासून कोरोना हा होता, आहे आणि असाच राहणार आहे. कोरोना जाईल असे कोणी जरी म्हटले तरी कोरोना जाणार नसल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सैनिक भरती झालेली नसून शासनाने भरती साठीची मर्यादा वर्षे वाढवून द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन झाले. उदयनराजे यांनी यावेळी अचानक आंदोलनस्थळी भेट देऊन मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले.