तुळजाभवानी देवीच्या खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकाला अटक


सोलापूर – तुळजापूर पोलिसांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी याला अटक केली आहे. नाईकवाडी गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 1 वर्ष फरार होता, पण अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 71 पुरातन नाणी नाईकवाडी यांनी हडप केल्याचा आरोप आहे.

9 मे 2019 रोजी याबाबत पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती, त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले.

दिलीप नाईकवाडी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकपदी कार्यरत असताना नाईकवाडी यांनी 29 नोव्हेंबर 2001 ते 30 नोव्हेंबर 2018 या कालावधीत पदाचा दुरुपयोग करत तुळजाभवानी मंदिर संस्थान व भाविकांची फसवणूक केली असून त्याच्या ताब्यात असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचा खजिना व जामदार खान्यातील अतिप्राचिन अलंकार, वस्तू तसेच भाविकांनी अर्पण केलेले सुमारे 34 तोळे सोने व 71 किलो चांदीच्या वस्तू तसेच 71 प्राचीन नाणे यांचा वैयक्तिक स्वार्थासाठी अपहार चोरी केली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी तत्कालिन धार्मिक व्यवस्थापक दिलीप देविदास नाईकवाडी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

निझाम, औरंगजेब, पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी तुळजाभवानी माते चरणी अर्पण केली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये या नाण्याची नोंद १९८० पर्यंत होती. पण २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते.

माहितीच्या अधिकारात गंगणे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती. त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले होते. अखेर या प्रकरणात आरोपी अटक झाल्यामुळे अनेक बाबी उघड होतील.