केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न – संजय राऊत


मुंबई – पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांच्या या आरोपांना आणि टीकेला उत्तर दिले आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.

नाट्याला एक परंपरा, पावित्र्य असून त्यात एक सत्यता असते. मराठी नाटकाला प्रतिष्ठा असल्याचा टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला. जे काही कालपासून घडत आहे किंवा घडवले जात आहे, ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा उपक्रम राबवला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

काल जी काही कारवाई आरोप करणाऱ्यांवर झाली, ती गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामध्ये आकस आणि सूड या शब्दांचा वापर करु नये. मी पूर्ण माहिती घेतली असून गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असे वाटले. ही कारवाई त्यातून झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. अशा लहान गोष्टीत मुख्यमंत्री पडत नाहीत. कोणी असे खोटे आरोप केले, तर आमच्या सरकारला भोक पडत नसल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस, तपास यंत्रणा आहेत. त्या सगळ्या संस्था, महाराष्ट्र पोलीस दल, राज्यातील संस्था निष्पक्षपणे तपास करत असता. पण तुम्ही केंद्र सरकारच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर, प्रमुख लोकांवर आरोप करत असाल आणि त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर गृहमंत्रालय कारवाई करु शकते. त्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांशी याविषयी मी बोललो असून याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे असे गृहमंत्रालयाला वाटले असेल तर त्यांनी तशी कारवाई केली असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

चंद्रावर, मंगळावर जाऊन किरीट सोमय्यांनी आमच्या लोकांच्या जमिनी शोधाव्यात. या देशात लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. याआधीही असे आरोप झाले आहेत. आरोप करणाऱ्यांच्या तोंडाला कोणी टाळे लावू शकत नाही. कोणी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आरोप करायचे ठरवले असेल, तर आम्ही काहीच करु शकत नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. आरोप मोदी, अमित शाह यांच्यावरही होतात. आरोप करणे सध्या फॅशन झाली आहे, त्यानुसार त्यांनी आरोप करत राहावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी भगवा रंग सोडून हिरवा रंग धारण केल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यासंबंधी बोलताना राऊत म्हणाले की, आमचा रंग कोणता आहे, तो लवकरच त्यांना कळेल. कायदेशीर कारवाई होत असेल, तर रंगाचा प्रश्न येतोच कुठुन ? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर तिरंगा पाहून कारवाई केली जात नाही. शिवसेनेवर असे आरोप करण्याआधी आपले अंतरंग झाकून पाहावे हेच मला सांगायचे आहे.