ब्रिटीश संसदेत भाषण करण्यासाठी मोदींना आमंत्रण

लंडन  – गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांना ब्रिटीश खासदारांनी ब्रिटन भेटीचे आमंत्रण दिले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून ब्रिटीश सरकार मोदींबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर देत आहे. आज त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ब्रिटनमधील दोन्ही प्रमुख पक्षांच्या खासदारांनी मोदींना ब्रिटन भेटीचे आमंत्रण दिले आहे.

इंग्लंडमधील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीच्या भारत मित्र गटाचे प्रमुख बेरी गार्डिनर यांनी नरेंद्र मोदींना इंग्लंड भेटीचे पत्र पाठवले आहे. इंग्लीश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आपले विचार मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी नरेंद्र मोदींना भविष्यातील भारत हा विषय देण्यात आला आहे.

लेबर पार्टीचे आणखी एक खासदार ब्रेन्ट नॉर्थ यांनी सांगितले की, मोदींना ब्रिटन भेटीचं आमंत्रण देणे हा अनेक वर्षांच्या मैत्रीचे फलीत आहे. नरेंद्र मोदी आणि लेबर पार्टीचे ज्येष्ठ सदस्य यांच्यात अनेक वर्षांपासून संवाद आहे. नरेंद्र मोदींवर टीका करता येईल किंवा त्यांचे कौतुकही करता येईल मात्र त्यांचा अनुल्लेख करणे योग्य नाही. मोंदींना अव्हेरणे योग्य नाही, असेही ब्रेंट नॉर्थ म्हणाले. फक्त इंग्लंडच नाही तर जागतिक समुदायालाही मोंदीशी संवाद करायला आवडेल. ते काय बोलतात, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे.