मुंबई – मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे, पत्त्यात बदल करणे, फोटो अपलोड करणे आदी सर्व कामे मतदाराला आता ऑनलाईन घरबसल्या करता येणार आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यईल. अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी आज मुंबई भाजपच्या एका शिष्टमंडळाला दिली. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतदारसंघापेक्षा विरोधीपक्षांच्या मतदारसंघातील यादयांमधील सर्वात जास्त मतदारांची नावे कमी करण्यात आल्याची तात्काळ गंभीर दखल घेत आयोगाने याबाबत एका स्वतंत्र अधिक-यामार्फत चौकशी करण्यात यईल. असे आश्वासनही या शिष्टमंडळाला दिले.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या आजी-माजी आमदार आणि खासदारांच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांची भेट घेतली. तसेच निवडणूक उपायुक्त डॉ. अशोक शुक्ला, सुधीर त्रिपाटी आणि आयोगाचे कायदेविषयक सल्लागार एक. के. मेदिदथा यांच्याशीही या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या मुंबईतील मानखुर्द मधून केवळ 780 तर घाटकोपर, बोरिवली, मुलुंड या विरोधीपक्षांच्या मतदार संघातील मतदार यादीतून तब्बल 20 हजार नावे 1 जानेवारी 2013 ला कमी करण्यात आली आहेत. ही बाब या शिष्टमंडळाने आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. त्याची तात्काळ गंभीर दखल घेत आयोगाने याबाबत एका स्वतंत्र अधिकर्यामार्फत चौकशी करण्यात यईल. असे आश्वासन दिले.
यापुढे मतदार यादयांमध्ये कोणत्याही माहितीचा बदल करावयाचा झाल्यास सर्व नागरिकांना ऑनलाईन घरबसल्या करता येईल. त्यासाठीची नवी पध्दत येत्या 1 आक्टोबरपासून कार्यान्वित करण्यात येईल. अशी माहिती आयुक्तांनीदिली. तसेच मतदार यादीतील नावांचे डोअर टू डोअर व्हेरिफिकेशन करण्याचे काम पुन्हा करण्यात येणार असून 1 जानेवारी 2013 जी नावे यादीतून काढण्यात आली त्या नावांचेही फेरतपासणी करण्याचे आयोगाने मान्य केले. तसेच एमएमआरडीए, एसआरए, प्रकल्पग्रस्त आणि अन्य पुनर्विकास योजनांमध्ये ज्या रहिवाशांचे स्थलांतर होते, त्या सर्वांची माहिती संबधित प्राधिकरणांकडून घेवून त्या सर्वांची नावे मूळ मतदारसंघातच ठेवण्यात येतील. असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.