नाट्य परिषदेच्या निवडणुकीतून 11 जणांची माघार

पुणे, – अखिल भारतीय नाट्यपरिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली त्यावेळी तीन अर्ज बाद झाल्याने 37 उमेदवार रिंगणात होते त्यापैकी तब्बल 11 उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने निवडणुक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना बळकटी आल्याची चर्चा नाट्यवर्तुळात आहे. नाट्य परिषदेची निवडणूक मध्यवर्तीच्या निवडणुकीपासून गाजावाजा करतच पार पडत असल्याने किमान पुणे शाखेने तरी नवा आदर्श निर्माण करावा; अशी इच्छा नाट्यरसिकांपासून सभासदांपर्यंत सगळेच बाळगून असल्याचे चित्र सध्यापर्यंत तरी निर्माण करण्यात आले आहे.

आलेल्या अर्जांची छाननी करून 37 नावांची यादी नाट्य परिषदेने जाहीर केली आहे. यात प्रतिभा दाते, विजयकुमार कोटस्थाने, श्रीकांत आंबेकर यांचे अर्ज बाद ठरले होते. सोमवारी ज्येष्ष्ठ अभिनेत्री अरूणा भट, केशव करवंदे, चंद्रकांत बांदल, अ‍ॅड. श्रीधर कसबेकर, मोहन कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, भालचंद्र पानसे, तुषार कर्‍हाडकर, प्रभाकर तुंगार, श्रीपाद गोखले आणि संतोष चोरडीयाया अकरा जणांनी माघार घेतली.

डॉ. सतीश देसाई, शांतीलाल सुरतवाला, सुधीर मांडके व सुनील महाजन या चौघांचे पॅनल असणार अशी नाट्यविश्‍वात चर्चा होती. यापैकी महाजन वगळता अन्य तिघांनी अर्ज भरले आहेत. परंतु, महाजन का नाही, असा प्रश्न नाट्यप्रेमींमध्ये निर्माण झाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत आणखी कोण -कोण माघार घेते हे 14 ऑगस्टला स्पष्ट होणार असले तरी तत्पूर्वीच निवडणुक बिनविरोध करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.