गोंधळामुळे संसदेचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली- सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर ठेवलेले आरोप, जम्मूमधील किश्तवार जिल्ह्यांतील हिंसाचार, वेगळा तेलंगणा, केरळमधील सौर घोटाळा आणि हरियाणातील सनदी अधिकारी अशोक खेमका यासर्वांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी सकाळी गोंधळातच सुरू झाले. काही काळ सर्वपक्षीय गोंधळामुळेच सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

सोमवारी सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर दिवंगत झालेल्या संसदेच्या माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतरच लगेचच डाव्या पक्षांच्या सदस्यांनी केरळमधील सौर घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी वढेरा यांच्यावर खेमका यांनी ठेवलेला ठपक्यांचा विषय उपस्थित केला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी वेगळ्या तेलंगणाला विरोध करून घोषणा देण्यास सुरूवात केली. भाजपच्या सदस्यांनी किश्तवारमधील हिंसाचाराचा मुद्दाही लावून धरला. या सगळ्यामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

याच विषयांवरून राज्यसभेतही सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १५ मिनिटांसाठी आणि नंतर १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बारा वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा एकदा गोंधळ सुरूच राहिल्याने कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यारमुळे आता दुपारनंतर पण गोंधळ सुरूच राहिला तर कामकाज सुरू होणार की नाही याबाबत शंकाच आहे.