जम्मू- पाकिस्तानने जम्मू व काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर रविवारी रात्री दहा वाजल्यापासून सोमवारी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत गोळीबार केला. यामध्ये कसलीच जीवित हानी झाली नाही. दरम्यान, मंगळवारी पूँछ भागातील भारतीय चौकीवर केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान रामसिंह मीना यांचा रविवारी दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे एकूण सहा जवान शहीद झाले.
जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील दिगवार गावात रविवारी रात्री दहा वाजल्यापासून रात्रभर गोळीबार सुरु होता, असे सैन्य दलाच्या एका अधिका-याने सोमवारी सकाळी सांगितले. पाकिस्तानी सैनिक अत्याधुनिक आणि अवजड शस्त्र डागत असल्याचे या अधिका-याने सांगितले. त्यांना भारताकडून चोख प्रतिउत्तर दिले जात आहे.त्याआधी, रविवारी सकाळी जम्मूच्या कनाचक पट्टय़ातील अल्फा मचियाल चौकीवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचा पवन कुमार शर्मा हा जवान गंभीर जखमी झाला. पुँछ जिल्ह्यातील बालाकोट येथेही गोळीबार झाला होता.
दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी पूँछ भागातील भारतीय चौकीवर केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान रामसिंह मीना यांच्या छातीजवळ गोळी लागली होती. त्यामुळे उपचारासाठी दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे एकूण सहा जवान शहीद झाले.