पाणबुडीवरील अणुभट्टी कार्यान्वित

नवी दिल्ली – आयएनएस अरिहंत या स्वदेशी बनावटीच्या अण्विक पाणबुडीवरील अणुभट्टी कार्यान्वित झाली आहे. अरिहंत ही भारतात विकसित करण्यात आलेली
पहिली अणवस्त्र पाणबुडी आहे. अरिहंतवरील अणुभट्टी कार्यान्वित झाल्यामुळे भारताला पाण्याखालून अणवस्त्र हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विशाखापट्टणमधील जहाज बांधणी केंद्रात अरिहंतवर बसवण्यात आलेल्या यंत्रणेच्या वेगवेगळया चाचण्या सुरु होत्या. अणुभट्टी आणि क्षेपणास्त्र यंत्रणा खोल समुद्रात किती कार्यक्षमतेने काम करते ते तपासण्यात येणार असून पुढील दीडवर्ष या चाचण्या चालणार आहेत. त्यानंतरच पूर्ण क्षमतेने अरिहंत नौदलाच्या सेवेत रुजू होईल.

अरिहंतमुळे भारताला जमीन, हवाई आणि समुद्रमार्गे अणवस्त्र हल्ला करणे शक्य होणार आहे. सध्या पाक व चीनकडून होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या
अणुभट्टीचे विशेष महत्त्व आहे.