हिंगोली: वाळू माफियांनी हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवळकर यांच्याकवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. वाळू माफियांनी वाळूचे दोन ट्रॅक्टर तहसीलदार कडवळकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र कडवळकर यांनी प्रसंगवधान राखून बाजूला उडी मारल्याने ते या जीवघेण्याच हल्ल़ायातून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर वाळू उपसा करणारे पाचही चालक ट्रॅक्टरसह पळून गेले.
हिंगोली तालुक्यातील पातोंडा परिसरात पैनगंगा नदीमधून सध्या अवैधरित्या वाळू उपसा सुरु आहे. या भागातील वाळू उपशाची मुदत ३० तारखेला संपली. पण तरीही वाळू उपसा सुरु असल्याने गावक-यांनी तहसीलदार विद्याचरण कडवळकर यांना याची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदारांनी अचानक धाड टाकल्याने वाळू माफियांनी त्यांच्यावरच हल्ला केला असल्याचे समजते.
या घटनेनंतर वाळू उपसा करणारे पाचही चालक ट्रॅक्टरसह पळून गेले. पण हा प्रताप करणा-या वाळू माफियांच्या चार ट्रॅक्टर्सचे नंबर ग्रामस्थांनी नोंद करुन घेतले. हे सर्व ट्रॅक्टर विदर्भातील आहेत. या पाच हल्लेखोरांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.